What Happened on August 1st This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे एक ऑगस्ट रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी 1920 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी अखेरचा श्वास घेतला होता. एक ऑगस्ट 1920 रोजी महात्मा गांधी यांनी असहकार आंदोलन पुकारले. लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती आजच आहे. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी -

भारतीय असंतोषाचे जनक समजले जाणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak) यांची आज पुण्यातिथी आहे. 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबईमध्ये लोकमान्य टिळक यांनी अखेरचा श्वास घेतला.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील 'लाल-बाल-पाल' या त्रयींमधील ते एक होते. भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक अशा विविध भूमिका त्यांनी पार पाडल्या. लोकमान्य टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात. 1881 ते 1920 या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी 513 अग्रलेख लिहिले. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' ' टिळक सुटले पुढे काय ', ' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ', आदी अग्रलेख चांगलीच गाजली.

लोकमान्य टिळकांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत ब्रिटिश राजवटीपासून भारतीय स्वायत्ततेसाठी लढा दिला. लोकमान्य टिळक हे जहालमतवादी नेते ओळखले जात असे. टिळक हे कट्टर राष्ट्रवादी परंतु सामाजिक परंपरावादी मानले जात होते. लोकमान्य टिळकांवर 1897 आणि 1908 मध्ये असे दोन वेळेस राजद्रोहाचे खटले चालवण्यात आले आहेत.

असहकार आंदोलन Non-cooperation movement

एक ऑगस्ट 1920 रोजी महात्मा गांधी यांनी असहकार आंदोलन पुकारले. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर महात्मा गांधी यांनी इंग्रजांविरोधात असहकार चळवळ सुरु केली होती. ब्रिटिशांशी असहकार केला, तर ब्रिटिश एक दिवसही राज्यकारभार चालवू शकणार नाहीत, असे गांधीजींचे मत होते. त्यामुळे त्यांनी हे आंदोलन पुकारले होते. त्यासाठी राष्ट्रीय सभेने असहकाराचा कार्यक्रम मंजूर केला. ब्रिटिश सरकारने दिलेल्या पदव्या, मानसन्मान नाकारायचे, सरकारी शाळा महाविद्यालयांमध्ये जायचे नाही. परदेशी मालावर बहिष्कार घालायचा, वकिलांनी सरकारी न्यायालयातील कामावर बहिष्कार टाकायचा, असे आंदोलनाचे स्वरूप होते. उत्तर प्रदेशातील चौरी चौरा येथे इंग्रजांविरोधात शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले. पण यावर पोलिसांनी लाठीहल्ला केला, म्हणून चिडून आंदोलकांनी पोलीस चौकीला आग लावली. या आगीत काही पोलीस मृत्युमुखी पडले. त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये महात्मा गांधी यांनी हे आंदोलन मागे घेतले.

लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती -

जाती व्यवस्थेच्या चटक्याने ज्यांना अवघ्या दीड दिवस शाळेत शिक्षण मिळाले. पण, आपल्या लेखणीतून कष्टकरी, सर्वाहारा, उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडणारे लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगलीतील वाटेगाव येथे त्यांचा जन्म झाला होता. पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे, असे ऐतिहासिक वक्तव्य त्यांनी 1958 च्या दलित साहित्य संमेलनात काढले होते. मुंबईची लावणी, माझी मैना गावावर राहिली..आदी पोवाडे त्यांचे चांगलेच गाजले.

अण्णाभाऊ 1932 साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईतील कम्युनिस्ट नेत्यांच्या नेतृत्त्वात सुरू असणाऱ्या चळवळीकडे अण्णाभाऊ आकर्षित झाले आणि पक्षाचे काम सुरू केले. कम्युनिस्ट पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ यांना शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहित केले. त्याच्या परिणामी अण्णाभाऊ यांनी शिक्षण घेतले. त्यातून त्यांनी आपल्या सभोवतालचे वास्तव आपल्या लेखणीतून मांडले.

जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्याकंजारी (1960), चिरानगरची भुतं (1978), कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह आहेत. तर, फकिरा (1959), वारणेचा वाघ (1968), चिखलातीलकमळ, रानगंगा, माकडीचा माळ (1963), वैजयंता ह्यांसारख्या 35 कादंबऱ्यांचे लेखन त्यांनी केले आहे. माझा रशियाचा प्रवास हे त्यांचे प्रवासवर्णन ही गाजले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या 7 कादंबऱ्यांवर चित्रपटांची निर्मिती झाली.

मीना कुमारी यांची जयंती -

बॉलिवूडच्या अजरामर अभिनेत्री मीना कुमारी (Meena Kumari) यांचा जन्म 1 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईतील एका सामान्य कुटुंबात झाला होता. मीना कुमारी यांचं आयुष्य खूपच फिल्मी आहे, ना मनोरंजन विश्वात ‘ट्रॅजेडी क्वीन’ या नावाने ओळखले जाऊ लागले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मीना कुमारी यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. पैसे नसल्यामुळे तिला शिक्षण पूर्ण करता आलं नाही. वडिलांच्या आग्रहामुळे त्यांनी लग्न केलं. पण पती त्रास देत असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आयुष्यात घडत असलेल्या घडामोडींचा परिणाम मीना कुमारी यांच्या मनावर झाला. विदेशात जाऊन त्यांनी उपचार केले. पण उपचारादरम्यान 31 मार्च 1972 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

'पिया घर आजा','श्री गणेश महिमा','परिणीता' आणि 'बैजू बावरा' अशा सुपरहिट सिनेमांच्या माध्यमातून मीना कुमारी घराघरांत पोहोचल्या आहेत. सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे मीना कुमारी अनेकदा चर्चेत आल्या आहेत.

इतर महत्वाच्या घडामोडी

1883 : इंग्लंडमध्ये डाक सेवेला सुरुवात
1948 : मार्वल स्टुडिओ चे संस्थापक एव्ही अराद यांचा जन्म.
1960 : इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.
1981: अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.
1994 : भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.
2004 : रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाची स्थापना झाली. 3 ऑगस्ट 2004 रोजी या विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले.
2004 : भारताचा पराभव करत श्रीलंकाने आशिया चषकावर नाव कोरले.
2008 : क्रिकेटपटू अशोक मंकड यांचे निधन.
2022 : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक

from india https://ift.tt/5LCFaYg
https://ift.tt/sXLzY5i
Today In History : लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती, इतिहासात आज
July 31, 2023
0